जाहलें भजन आम्ही नमितों चरणा । नमितों तव चरणा ।
वारुनिया विघ्नें देवा रक्षावे दीना ।। धृ ।।
दास तुझे आम्ही देवा तुजलाची ध्यातों । देवा तुजलाची ध्यातों ।
प्रेमें करुनियां देवा गुण तुझे गातों ।। १।।
तरी न्यावी सिद्धी देवा हेची वासना । देवा हेची वासना ।
रक्षूनियां सर्वां द्यावी आम्हासी आज्ञा ।। २।।
मागणें तें देवा आतां एकची आहे । आतां एकची आहे ।
तरुनियां सकळां आम्हां कृपादृष्टी पाहें ।। ३।।
जेव्हां सर्व आम्ही मिळूं ऐशा या ठाया । ऐशा या ठाया ।
प्रेमानंदें लागू तुझी कीर्ती गावया ।। ४।।
सदा ऐशी भक्ती राहो आमुच्या मनीं । आमुच्या मनीं ।
हेची देवा तुम्हा असे नित्य विनवणी ।। ५।।
वारुनियां संकटें आतां आमुची सारी । आतां आमुची सारी ।
कृपेची साउली देवा दीनावरि करीं ।। ६।।
निरंतर आमुची चिंता तुम्हां असावी । चिंता तुम्हा असावी ।
सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी ।। ७।।
निरोप घेतों आतां आम्हां आज्ञा असावी ।
चुकलें आमुचें कांहीं त्याची क्षमा असावी ।।
॥१॥