ॐAarti Sangraha
My Sangraha
🗡️

Khandoba ·

मार्तंडाष्टक (खंडोबाची आरती)

मार्तंडाष्टक या खंडोबा आरतीबद्दल थोडक्यात माहिती.

मूळ आणि इतिहास: खंडोबाला (मल्हारी मार्तंड) शिवाचा अवतार मानून आठ कडव्यांत गायलेले हे अष्टक महाराष्ट्रातील कुलदैवत खंडोबाच्या उपासनेत रूढ आहे; रचनाकाराचे नाव मजकुरात दिलेले नाही.

स्वरूप आणि वैशिष्ट्ये: सदाशिवाने मणिमल्ल दैत्याचा वध करण्यासाठी खंडेरायाचा अवतार घेतल्याची कथा, तसेच पेंबर, पाली, निमगाव आणि जेजुरी या स्थानांचा उल्लेख आठ कडव्यांत येतो; प्रत्येक कडव्याचा शेवट "तो हा पाहु चला" या ओळीने होतो.

महत्त्व: खंडोबाच्या भक्तांमध्ये जेजुरी व इतर खंडोबा-स्थानांच्या पूजेत मार्तंडाष्टक म्हणण्याची परंपरा आहे.

फायदे: शेवटच्या कडव्यानुसार जो हे अष्टक पठण करतो किंवा ऐकतो त्याला कळिकाळाचे भय राहत नाही अशी श्रद्धा आहे.

कधी म्हणावी: खंडोबाच्या नित्य पूजेत, चंपाषष्ठी व जेजुरीच्या यात्रेच्या प्रसंगी.

त्रैलोक्यी मणिमल्ल दैत्यसकळा अजिंक्य झाले मही ।

त्याही ब्राह्मण यज्ञहोम हवने विध्वंसिली सर्वही ॥

आला ते समयीं सदाशिवस्वये सोडोनि ब्रह्मांड हो ।

तो हा पाहू चला कृपाजलनिधी मल्हारि मार्तंड हो

॥१॥

संगे घेऊनि सप्तकोटि गण हे आला असे भूतला ।

खंडेराव म्हणोनिया अवगला शरत्वतेची लिला ॥

सक्रोधे मणिमल्ल मर्दुनि तया केला पहा दंड हो ।

तो हा पाहु चला

॥२॥

संतोषे गन सर्वदा उथळिती भंडार देवावरी ।

झालासे विजयी म्हणोनि दिवट्या लावोनिया पेंबरी ॥

केला वास शिवे तळ्या उचलिल्या निर्दाळिले लंड हो ।

तो हा पाहु चला

॥३॥

घेता हा अवतार दुष्ट दमुनी सद्भक्त संरक्षिले ।

गाई ब्राह्मण यज्ञयाग सगळे हे धर्म संस्थापिले ॥

गाती भक्त, ऋशि, गण सदा सत्कीर्ति उदंड हो ।

तो हा पाहु चला

॥४॥

प्रारंभी स्थल पेंबरी, तदुपरी पालीस आला असे ।

निमगावी तिसरे विशेष चवथे हे जेजुरीचे दिसे ॥

ऐशी योजुनि स्थानके विचर्तो नौखंड पृथ्वीत हो ।

तो हा पाहु चला

॥५॥

शोभे दिव्यकळा सुरंग पिवळा आपादपर्यंत हो ।

घाले लोचन पाहता मुखशशी तो हा म्हाळसाकांत हो ॥

अश्वारूढ- करी सळंब झळके ते शस्त्र आखंड हो ।

तो हा पाहु चला

॥६॥

ऐशा या कुलदेवतास नमुनी जो नित्य भावे भजे ।

त्याला काय उणे? न मागत तरी अप्राप्त तेही दिजे ॥

दाता देईल भुक्तिमुक्ति समुळी वारूनि पाखंड हो ।

तो हा पाहु चला

॥७॥

मार्तंडाष्टक जो पठेल अथवा ऐकेल अत्यादरे ।

त्याचे हा कळिकाळ दास्य करुनि राहील हो हे करे ॥

तेतेह शाश्वत रंगला निजसुखे नासूनिया बंड हो ।

तो हा पाहु चला

॥८॥