जय देवा हनुमंता ।
जय अंजनीसुता ॥
ॐ नमो देवदेवा ।
राया रामाच्या दूता ॥
आरती ओवाळीन ।
ब्रह्मचारी पवित्रा ॥ ध्रु० ॥
॥१॥वानरूपधारी ।
ज्याची अंजनी माता ।
हिंडता वनांतरी ।
भेटी झाली रघुनाथा ॥
धन्य तो रामभक्त ।
ज्याने मांडिली कथा ॥ जय०
॥१॥सीतेच्या शोधासाठीं ।
रामे दिधली आज्ञा ॥
उल्लंधुनी समुद्रतीर ।
गेला लंकेच्या भुवना ॥
शोधूनी अशोकवना ।
मुद्रा टाकिली खुणा ॥ जय०
॥२॥सीतेसी दंडवत ।
दोन्ही कर जोडून ॥
वन हे विध्वंसिले ।
मारिला अखया दारुण ।
परतोनी लंकेवरी ।
तवं केले दहन ॥ जय०
॥३॥निजबळे इंद्रजित ।
होम करी आपण ॥
तोही त्वां विध्वसिला ।
लघुशंका करून ॥
देखोनी पळताती ।
महाभूते दारुण ॥ जय०
॥४॥राम हो लक्षुमण ।
जरी पाताळी नेले ॥
तयांच्या शुद्धीसाठी ।
जळी प्रवेश केले ॥
अहिरावण महिरावण ।
क्षणामाजि मर्दिले ॥ जय०
॥५॥देउनी भुभुःकार ।
नरलोक आटीले ॥
दीनानाथ माहेरा ।
त्वां स्वामिसी सोडविले ॥
घेऊनी स्वामी खांदी ।
अयोध्येसी आणिले ॥ जय०
॥६॥हनुमंत नाम तुझे ।
किती वर्णू दातारा ॥
अससी सर्वांठायी ।
हारोहारी अम्बरा ॥
एका जनार्दनी ।
मुक्त झाले संसारा ॥ जय०
॥७॥