जय देव जय देव जय भैरवनाथा ।
सुंदर पदयुग तूझे वंदिन निजमाथा ॥ ध्रु० ॥
॥१॥भैरवनाथा गौरव दे मज भजनाचे ।
रौरव संकट नाशी जनना- निधनाचे ॥
निशिदिनि देवा दे मज गुणकीर्तन वाचे ।
कैरवपदनखचंद्री करि मन मम साचे ॥ जय०
॥१॥भवभयभंजन सज्जनरंजन गुरुदेवा ।
पदरजअंजन लेता प्रगटे निज ठेवा ॥
जेव्हा दर्शन देसी भाग्योदय तेव्हा ।
अनंत पुण्ये लाधे आम्हा तव सेवा ॥ जय०
॥२॥कलिमलशमना दानवदमना दे पाणी ।
डमरूरव अमराते निर्भय सुखदानी ॥
काशीरक्षक तक्षकमालाधर चरणी ।
तोडर मिरवी अरिंगन मस्तकि मनकर्णी ॥ जय०
॥३॥लक्षी करुणाचक्षी अनुचर निजपक्षी ।
भक्षी दुष्टा सुष्टा संरक्षी ॥
साक्षी कर्माकर्मी ज्गदंतरकुक्षी ।
मुमुक्षुपक्षी वसती तव पदसुरवृक्षी ॥ जय०
॥४॥सोनारी पुरधामी भैरव कुळस्वामी ।
स्मरता सत्वर पावसि संकटहरनामी ॥
इच्छित देसी दासा जो जो जे कामी ।
मुक्तेश्वरीम हेतू निश्चय कुळधर्मी ॥ जय०
॥५॥