ॐAarti Sangraha
My Sangraha
🕉️

Datta ·

आरती दत्तात्रयप्रभुची

आरती दत्तात्रयप्रभुची या दत्तात्रयाच्या दीर्घ आरतीबद्दल थोडक्यात माहिती.

मूळ आणि इतिहास: सात कडव्यांची ही दीर्घ आरती दत्तात्रयांच्या रूपाचे व लीलांचे वर्णन करते; शेवटच्या कडव्यातील "भक्तराज" या उल्लेखावरून ती भक्तराज या कवीची असल्याचे सूचित होते.

स्वरूप आणि वैशिष्ट्ये: प्रत्येक कडव्यात मध्ये "चाल" म्हणून बदलणाऱ्या लयीची जोड असलेली ही आरती दत्तात्रयांचे चरणकमल, दंड-कमंडलू-शंख-चक्र-गदा-पद्म धारण करणारे रूप आणि औदुंबराखालची मूर्ती यांचे वर्णन करते; कुष्ठी द्विजाचा उद्धार, दरिद्री ब्राह्मणाला संतुष्ट करणे, वंध्येला पुत्ररत्न देणे व रजकाला चक्रवर्ती करणे अशा लीलाही यात येतात.

महत्त्व: दत्तसंप्रदायात दत्तात्रयांच्या अघटित लीलांचे स्मरण करून देणारी ही आरती दत्तपूजेत म्हटली जाते.

फायदे: श्रद्धेने पठण केल्याने दयाळू दत्तगुरूंची कृपा लाभून जन्ममरणाचे चक्र सुटते अशी श्रद्धा आहे.

कधी म्हणावी: गुरुवारी, दत्त जयंतीला व दत्तपूजेच्या वेळी.

आरती दत्तात्रयप्रभुची ।

करावी सद्भावे त्याची ॥ ध्रु० ॥

॥१॥

श्रीपदकमळा लाजविती ।

वर्तुल गुल्फ रम्य दिसती ॥

कटिस्थित कौपित ती वरती ।

छाटी अरुणोदय वरि ती ॥ चाल ॥

वर्णू काय तिची लीला ।

हीच प्रसवली, मिष्ट अन्न बहुम तुष्टचि झाले, ब्रह्म क्षत्र आणि, वैश्य शूद्रही सेवुनिया जीची ।

अभिरुची सेवुनिया जीची ॥ आरती०

॥१॥

गुरुवर सुंदर जगजेठी ।

ज्याचे ब्रह्मांडे पोटी ॥

माळा सुविलंबित कंठी ।

बिंबफळ रम्य वर्ण ओष्ठी ॥ चाल ॥

अहा ती कुंदरदनशोभा ।

दंडकमंडलु, शंखचक्र करि, गदापद्म धरि, जटामुगुट परि, शोभतसे ज्याची ।

मनोहर शोभतसे ज्याची । आरती०

॥२॥

रुचिरा सौम्य युग्मदृष्टी ।

जिने द्विज तारियला कुष्ठी ॥

दरिद्रे ब्राह्मण बहु कष्टी ।

केला तिनेच संतुष्टी ॥ चाल ॥

दयाळा किती म्हणूनि वर्णू ।

वंध्या वृद्धा, तिची सुश्रद्धा, पाहुनि विबुधची, पुत्ररत्न जिस, देउनियां सतिची ।

इच्छा पुरविली मनिची ॥ आरती०

॥३॥

देवा अघटित तव लीला ।

रजकही चक्रवर्ति केला ॥

दावुनि विश्वरूप मुनिला ।

द्विजोदरशूल पळे हरिला ॥ चाल ॥

दुभविली वांझ महिषि एक ।

निमिषामाजी, श्रीशैल्याला, तंतुक नेला, पतिताकरची, वेद वदविला, महिमा अशी ज्याची ।

स्मरहो महिमा अशि ज्याची ॥ आरती०

॥४॥

ओळखुनि शूद्रभाव चित्ती ।

दिधले पीक अमित शेती ॥

भूसुर एक शुष्कवृत्ती ।

क्षणार्धे धनद तया करिती ॥ चाल ॥

ज्याची अतुल असे करणी ।

नयन झाकुची, सवे उघडितां, नेला काशिस, भक्त पाहता, वार्ता अशि ज्याची ।

स्मरा हो वार्ता अशि ज्याची ॥ आरती०

॥५॥

दयाकुल औदुंबरी मूर्ती ।

नमोता होय शांतवृत्ती ॥

न देती जननमरण पुढती ।

सत्य हे धरा न मनि भ्रांती ॥ चाल ॥

सनातन सर्वसाक्षि ऐसा ।

दुस्तर हा भव, निस्तरावया, जाउनि सत्वर, आम्हि सविस्तर, पूजा करु त्याची ।

चला हो पूजा करु त्याची ॥ आरती०

॥६॥

तल्लिन हो‍उनि गुरुचरणी ।

जोडुनि भक्तराज पाणी ॥

मागे हेचि जनकजननी ।

अंती ठाव देई चरणी ॥ चाल ॥

नको मज दुजे आणिक काही ।

भक्तवत्सला, दीनदयाळा, परम कृपाळा, श्रीपदकमळा, दास नित्य याची ।

उपेक्षा करु नको साची ॥ आरती०

॥७॥